बळीराजासाठी एक दिवस
     बळीराजा म्हणजे आपला शेतकरी. शेतात काम करून , घाम गाळून मोत्याचे दाणे पिकवणारा अन्नदाता.आम्ही लहान असताना शाळा सुरु झाली कि पाऊस सुरु होत असे आणि पावसातून भिजत जातानाचा आनंद काय वर्णावा ! शेतामधून वाट काढत काढत शाळेकडे जाताना त्या अन्नदात्याचे साक्षात दर्शन घडे.मस्त आनंदात जात असताना त्या शेतकऱ्याबद्दल कमालीचा आदर वाटत असे. पण आज मात्र चित्र बदललेले दिसते. शेतीबद्दल मुलांच्या मनात अनास्था दिसून येऊ लागली आहे. पूर्वी आम्हाला पावसाची लावणीसाठी १५ दिवसांची सुट्टी असे. त्यावेळी आमच्या शेतीत काम करताना, घाम गाळताना भान हरपून जात असे. पण आताच्या मुलांना ती संधी मिळेनाशी झाली आहे. बरेचसे पालक आपल्या मुलांना घेऊन शहराकडे रवाना झाले आहेत. शेती टाकून पैसे मिळवण्यासाठी मुंबईसारख्या शहरात स्थायिक होऊ लागले आहेत. अर्थातच त्याचे आपल्या गावाकडे येणेही खूप अंशी कमी झाले आहे.पर्यायाने मुलांना शेतीविषयी प्रेम वाटणेही कमी होत चालले आहे.
    यावर काही प्रमाणात मात करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने सन २०१८ या वर्षी “ बळीराजासाठी एक दिवस “ हि संकल्पना आणली. शाळेतील शिक्षकांनी मुलांना घेऊन शाळेच्या जवळच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष शेतीकामाचा अनुभव घेण्याचे ठरवले. आम्ही हि संकल्पना आमच्या शालेय व्यवस्थापन समितीसमोर मांडली. समितीमधील बहुतांश सदस्य शेतकरी असल्यामुळे त्यांना ही संकल्पना खूप आवडली. त्यांनी ही कल्पना प्रत्यक्षात राबवायचे मान्य केले.
    आदल्या दिवशी मुख्याध्यापक श्री. अडूळकरसर यांनी शेतकऱ्यांशी संपर्क साधला व पूर्वकल्पना दिली. शेतकरी लगेचच प्रात्यक्षिक दाखवण्यास तयार झाले. दुसरा दिवस उजाडला. तो शनिवारचा दिवस होता. शाळा सकाळची होती. मुले सकाळी लवकरच शाळेत दाखल झाली. कधी एकदा शेतात जातो असे प्रत्येकाला झाले होते. सर्वांनी शेतात घालायचे साधे वेश परिधान करून आले होते. सकाळची वेळ असूनही सर्व मुले शेतात काम करण्यासाठी आतुर झाली होती. सर्व शिक्षकांनी मुलांना ओळीमध्ये उभे केले. जय जवान, जय किसान असे नारे देत देत मुले शेताकडे रवाना झाली. जाता जाता वाटेतील झाडेझुडपे पाहत पाहत रमत गमत मुले बांधावरून चालू लागली होती. जातानाची वाट ही जंगलातून होती.वाटेत दिसणाऱ्या विविध झाडांची नावे जाणून घेत घेत वानरसेना पुढे पुढे निघाली. जंगली वनस्पतींची नावे समजून घेताना एक वेगळाच अनामिक आनंद त्यांच्या डोळ्यात दिसत होता. औषधी वनस्पती , रानभाज्या, रानवेली, पालेभाज्या, पक्षी, पाळीव प्राणी, रानातील प्राणी  इ. चा प्रत्यक्ष अनुभव घेताना सर्व मुले मनापासून बोलकी होत होती.
    सर्व शिक्षक, विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षण विस्तार अधिकारी साहेब आपल्या शाळेतील मुलांना घेऊन शेताकडे चालले आहेत हे चित्रच खूप आनंद देणारे होते. सर्व पालकांना शाळेचा खूप अभिमान वाटत होताच, पण या दृश्यामुळे तो अधिक वृद्धिंगत होताना दिसत होता. शाळेत न येणारे ग्रामस्थही आपणहून चौकशी करायला पुढे सरसावले. या अभियानाचा एक हिस्साच होऊन गेले ते त्यांचे त्यांनाच कळले नाही. आणि एकदाची मुले शेताल दाखल झाली.
    शेतात जाताच मुलांनी आपणहून ओळी मोडून टाकल्या. आपल्या काका, बाबा, आजोबा, काकी, आई, भाऊ, बहिणीसोबत काम करायला उत्सुक झाली. पटपट कामे करायला सुरुवात झाली. मुलींनी तरवा काढायला सुरुवात केली. बघता बघता १०-१२ पेंढ्या कडून मोकळी झाली. आपले शेतीमित्र जसे करतील तसे करण्याचा व शिकण्याचा जाणीवपूर्वक प्रयास करू लागली. शिक्षक, अधिकारी यांनीही कामाला हातभार लावला. आलेले पालक काम समजून देत होते. जीव सांभाळून काम करण्याविषयी सूचना देत होते. नांगरणी करण्यासाठी मुलगे पुढे झाले. होता होता एका मळ्याचा चिखल कधी झाला ते कळले सूद्धा नाही. नांगर, रुमणी, गुटा, फाळ, जगाल, इश्याड, जू इ. नावे समजून घेऊन स्वत: वापरूनही पाहिली. मजा आली हे सर्व अनुभवताना सर्वांनाच. त्यानंतर लावणी सुरु झाली. त्याच वेळी वरूणराजाने बरसायला सुरुवात केली. मुले अधिक आनंदाने पावसात भिजत कामे पूर्ण करू लागली.घरी कधीच कामे न करणारी मुले कामे करताना पाहून त्यांच्या पालकांनाही आश्चर्य वाटले. मुलांना शेतकऱ्यांच्याबद्दल वाटणारा आदर अधिक वाढला. त्याच्या कामाविषयी गोडी वाढलेली दिसली. शेतीचे काम कमी दर्जाचे नसून ते जीवन देणारे आहे हे सर्व मुलांना समजले होते. शेतीच्या व शेतकऱ्यांच्या कामाविषयीची श्रमप्रतिष्ठा पुस्तकामधून शिकवण्यापेक्षा खूप कमी वेळात हे मूल्य मुलांच्यात रुजवता आल्याचा आनंद सर्व शिक्षकांच्या चेहऱ्यावर दिसत होता. अश्याप्रकारे आमच्या मांगवली नं. १ शाळेने राबवलेला हा उपक्रम खऱ्या अर्थाने सार्थकी लागला.     

लेखन : श्री. प्रवीण अशितोष कुबल.
        पदवीधर प्राथमिक शिक्षक,
        वि. मं. मांगवली नं. १ , ता. वैभववाडी.
        जिल्हा : सिंधुदुर्ग.


    

   

Comments

Popular posts from this blog